पंढरपूर : लहान-मोठे उद्योग धंदे करणार्या व्यापारी वर्गाचे वीज बिल पूर्णपणे माफ करावे अथवा घरगुती
दराने काही कालावधीची सुट देवून आकारणी करणे व पुढील 6 महिने थकबाकीमुळे कोणाचीही वीजतोड
करू नये अशा प्रकारची मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री
मा.अजितदादा पवार, उर्जामंत्री मा.नितीनजी राऊत यांचेकडे केली आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात वाढत असल्यामुळे केंद्र शासनाने संपुर्ण देशात दि.22/03/2020 पासून संचारबंदी आदेश जारी केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग धंदे व सर्व लहान-मोठे व्यवसाय करणारे दुकाने जवळ-जवळ मागील तीन महिन्यापासून बंदच आहेत. संचारबंदी टप्याटप्याने उघडली जाणार असल्याने आणखी पुढील अंदाजे दोन ते तीन महिने सर्व दुकाने बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुकाने बंद असल्यामुळे त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने सर्व व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. आर्थिक उलाढाल होत नसल्याने व्यापारी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे, त्यांना पुढील काळात पुन्हा नव्या उमेदीने उभा करणेसाठी आर्थिक ताकद देणे गरजेचे असलेचेही आ.प्रशांत परिचारक यांनी म्हंटले
आहे.
या लहान-मोठे व्यवसाय करणारे दुकानदार यांचे वीज बिल कर्मशिअल दराने आकारणी केली जाते. अशा परिस्थीतीत व्यवसाय करणार्या दुकानदारांकडून वीज बिल भरणे शक्य होणार नसलेने या दुकानदारांचे वीज बिल माफ करावे किंवा शासनास दुकानदारांचे वीज बिल माफ करणे शक्य नसेल तर त्या दुकानदारांचे वीज बिल घरगुती(रेसिडन्सी) दराने आकारणी करावी. तसेच पुढील 6 महिने थकबाकीमुळे कोणाचीही वीज तोड करू नये. जेणेकरून कोरोनाच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला याचा लाभ होवून आर्थिक सुलभता प्राप्त करणे शक्य होईल.


