पंढरपूरातील कुटुंबांना सिंधुदुर्गात मिळाला आपुलकीचा ओलावा

0
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. अर्थात त्याचाच भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे सील करण्यात आलेल्या आहेत. या लॉकडाऊनमुळे पंढरपुरातील काही कुटुंबे सिंधुदुर्गात अडकून पडली आहेत. या सर्वांना प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 
       पंढरपूरमधील ही सर्व कुटुंबं मालवणनजीकच्या आंगणेवाडीत आली होती. प्लास्टिक वस्तू व खेळण्यांच्या विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. भराडीदेवीच्या यात्रेच्या निमित्ताने ही कुटुंबे येथे आली. ही यात्रा झाल्यानंतर कुणकेश्वर आणि अन्य यात्रा करून परत पंढरपूरला जायचे, अशी त्यांची योजना होती. मात्र, सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद झाल्याने ही सर्व कुटुंबं आंगणेवाडीतच अडकून पडली. सगळंच ठप्प झाल्याने या सर्वांचेच हाल झाले. मोठी माणसे व लहान मुले धरून हे २७ जण आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यामध्ये दोन गर्भवती महिलाही आहेत. 
        याबाबत कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खिरमाळे यांना माहिती मिळाली आणि लगेचच सर्व यंत्रणा सक्रिय झाली. प्रांताधिकारी खिरमाळे यांनी याविषयीची सर्व सूत्रे हाती घेऊन प्रथम दोन्ही गर्भवती महिलांना रुग्णालयात हलवले आणि त्यांची होणारी आबाळ थांबवली. खिरमाळे यांच्या आदेशानुसार मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी तातडीने या कुटुंबीयांना मदत पुरवली आणि त्या महिलांना आरोग्य सेवा देण्याची व्यवस्था केली. माजी खासदार निलेश राणे यांनी या कुटुंबियांना धान्य व अन्य मदत केली केली. काही सेवाभावी संस्थाही मदतीसाठी पुढे सरसावल्या. मालवणचे आमदार वैभव नाईक यांनीही या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. एकूणच पंढरपूरपासून शेकडो मैल दूर असलेल्या या कुटुंबांना सिंधुदुर्गात आपुलकीचा ओलावा मिळाला आहे. या आपुलकीने हे सारेजण भारावले आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)