पांडुरंग परिवाराच्यावतीने प्रणव परिचारक यांनी 'फेसबुक संवाद' चा लाईव्ह कार्यक्रम केला. त्यामध्ये पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन परिचारक यांना थेट प्रश्न विचारले.
पंढरपूर लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक कार्यकर्त्याना बरेच प्रश्न पडलेले असतात. कधी ते अधिकाऱ्यांना विचारतात, तर कधी आपल्या लोकप्रतिनिधींना! परंतु सातत्याने त्यांच्याशी संवाद कायम ठेवणे हे अशा संचारबंदीमध्ये शक्य होत नाही, म्हणूनच अशा काळामध्ये फेसबूक संवाद हे माध्यम सर्वात प्रभावी ठरत आहे. राज्याच्या बहुतांश मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी अशाच पद्धतीने संवाद साधला आहे.
या कार्यकर्त्यांमध्ये पंढरपूर तालुक्यासह सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातीलही विद्यार्थी,शेतकरी आणि नोकरदार मंडळी होती. अनेकांनी टाकळी आणि इसबावी बद्दलच्या नागरी सुविधांबाबत प्रश्न विचारले, तर बऱ्याच लोकांनी खत मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. प्रत्येकाच्या कोरोना चाचणी होण्यापासून ते या लॉकडाऊन काळानंतरची आर्थिक घडी बसविण्याबाबतच्या अनेक प्रश्नांबाबत कार्यकर्त्यांनी प्रणव परिचारक यांच्याशी थेट संवाद साधला. श्री परिचारक यांनी देखील प्रत्येक प्रश्नाला सुमारे तीन ते चार मिनिटे उत्तरे दिली. जे कामे रखडली आहेत, त्यांचे नोटिंग घेत असताना परिचारक दिसून आले. याबाबत उपविभागीय अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून अनेकांना त्यांनी आश्वस्त केले, तर अनेकांचा दूरध्वनी क्रमांक घेऊन नंतर संपर्क साधत असल्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात अनेक युवकांनी सहभाग घेतला

