राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार जयंत गणेश पुराणिक यांना जाहीर
सोलापूर (प्रतिनिधी) - यंदाचा राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार पंढरपूरचे सुप्रसिद्ध उद्योजक जयंत गणेश पुराणिक यांना जाहीर केल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख यांनी दिली आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकारकडे पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जातोय.
जयंत पुराणिक यांनी वयाच्या सतराव्या वर्षी वडिलोपार्जित दुधडेअरी सुरु केली. पूर्वी पंढरपूरात चक्का विकला जायचा. पुराणिक यांनी आपल्या डेअरीमध्ये प्रथमच तयार श्रीखंड विकायला सुरुवात केली तसेच मिठाईचे दुकान चालू केले. स्वातंत्र्य सैनिक कै शंकरराव पुराणिक उद्योग भवन हे उदयोग संकुल उभे केले. यामुळे अनेकांना उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
शुक्ल यजुर्वेदी संस्थेच्या अधिवेशनात युवा संघटने अध्यक्षपद सांभाळले. त्यामुळे अनेक युवकांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळाले व त्यांना मदतही केली.
जुनी मेंढे गल्लीतील दुध डेअरी त्यांनी पश्चिमद्वार येथे सुरु केली. डेअरी व्यवसायाबरोबर त्यांनी पंढरीत येणाऱ्या भाविक भक्तांच्या राहण्याच्या सेवेसाठी श्रीमंगल लॉजही सुरु केले. तसेच भजनदास चौक येथे नव्याने त्यांनी डेअरीची दुसरी शाखा व नारायणी एक्झिक्युट नावाने लॉज देखील निर्माण केले आहे.
व्यवसाय बरोबर त्यांनी समाजाचे भान राखत श्रीयाज्ञवल्क्य आश्रमाचे अध्यक्षपदही भूषवले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी संस्थेमध्ये अनेक सुधारणा करून घेतल्या. त्यांनी काही दिवस बॉक्सींग असोसिएशनचे सदस्य म्हणून ही काम पाहिले. त्यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


