पंढरपूर - पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवार दि.१८/०३/२०२५ रोजी आडत दुकाने बंद ठेवली व शेतकरी यांचे नुकसान झाले बाबत माढा तालुक्याचे आमदार श्री. अभिजीत पाटील साहेब यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना बाजार समिती व संचालक मंडळाच्या वतीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नास उत्तर देण्यांस मी बांधील आहे असे सांगत बाजार समितीचे सभापती मा.श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड यांनी सर्व घटनाक्रम सांगितला.
पंढरपूर बाजार समितीमध्ये दर मंगळवार दु.१ वा. सौदे सुरू होतात. सिझनमध्ये हलक्या प्रतीच्या मालाचे सौदे शनिवारी होतात. खरेदीदार व्यापारी हे सर्व बाहेरगावावरून म्हणजेच नाशिक, तासगांव, सांगली, विजापुर इ. येथुन येत असतात. म्हणुन सौदे कामकाज दुपारी सुरू होते. बाजार समितीने सर्व बेदाणा विक्री करणारे आडते यांचेसाठी १५ मिनीटांचा वेळ दिलेला आहे. परंतु सदर वेळेमध्ये सर्व बेदाणा सॅम्पल मालाचे सौदे पुर्ण होत नाहीत. अशा सर्व ३० आडत्यांना १५ मिनीटांप्रमाणे वेळ दिला व बाहेरगावाहुन येणारे खरेदीदार उशीराने आल्यास सौदे सुरू होण्यास उशीर झाल्यास फक्त १५ मिनीटांप्रमाणे सौदे कामकाज ८ तास म्हणजेच रात्री १० पर्यंत चालतात. सदर आडत्यांना १५ मिनीटांप्रमाणे वेळ देवून सर्व दुकानचे सौदे होण्यास रात्री १० वाजतात. रात्री मालाची गुणवत्ता लवकर कळत नसल्याने मालास योग्य भाव मिळत नाही. म्हणूनच दिवसा सौदे कामकाज करणेसाठी व प्रत्येक आडत्यांना वाढीव पुरेसा वेळ देण्याची प्रक्रिया पाहणेसाठी ६ बेदाणा आडत दुकाने तात्पुरते बंद केले होते.
या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच २५२ गाडी म्हणजेच २५२०० क्विंटल माल विक्रीसाठी आला होता तरीही विकमी रू.६५१/-प्रति किलो इतक्या दराने बेदाणा मालाची विकी झाली. सौदे कामकाज हे रात्री उशीर पर्यंत होत असल्याने रात्री बेदाणा मालास योग्य दर मिळत नसले बाबत द्राक्ष बागायतदार संघाने या बाजार समितीकडे आडत्यांना १५ मिनीटांऐवजी वेळ वाढवुन मिळणे साठी व मालाची गुणवत्ता, शेतकरी यांना मालाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी बेदाणा सौदे कामकाज दिवसा करणे बाबत वेळोवेळी मागणी केलेली आहे. यासाठीच बाजार समितीने ६ दुकान गाळे तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेले होते असे सांगितले.
तसेच यावेळी त्यांनी श्री. अभीजीत पाटील यांनी सांगिलेल्या प्रमाणे ३०० शेतकरी माल घेवून उभे आहेत या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, आपण या ३०० लोकांची यादीची तकार आमचेकडे करावी. तसेच एखादी संस्था उभा करणेसाठी किती अभ्यास करावा लागतो, किती त्याग करावा लागतो याचाही थोडासा अभ्यास करावा असे निक्षुण सांगितले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती मा.श्री. राजुबापू विठ्ठलराव गावडे संचालक मा.श्री. दिलीप चव्हाण, मा.श्री. महादेव लवटे व अन्य संचालक, द्राक्ष बागायतदार संघाचे मा. अध्यक्ष श्री. प्रशांतभैय्या देशमुख, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव श्री. माउली हळणवर व इतर आदी उपस्थित होते.


