मंदिर समितीच्या वतीने राज्यपाल महामहीम सी. पी. राधाकृष्णन मंदिर समितीचे सह अध्यक्ष औसेकर महाराज यांच्या हस्ते सन्मान

0

पंढरपूर - महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम सी. पी.  राधाकृष्णन यांचा शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने  समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते श्रीं विठ्ठल रुक्मिणीमातेची मूर्ती व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. 

   दि. 15 ऑक्टोबर रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार, प्रतिष्ठित व्यक्ती, आजी-माजी खासदार व आमदार, जिल्ह्यातील सर्व अधिकारी, राजकीय नेते, राजकीय पक्ष, जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी यांच्याशी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे त्यांनी संवाद साधला. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील देवस्थानच्या मुख्य विश्वस्तांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते. 

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, टोकन दर्शन व्यवस्था, मंदिर जतन व संवर्धन आराखड्या संदर्भात व इतर अनुषंगिक बाबी बाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विविध खात्याचे शासकीय अधिकारी, विविध देवस्थानचे विश्वस्त, पत्रकार, एनजीओ चे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)