मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्यानंतर मा आ दत्तात्रय सावंत यांनी नारळ पाणी घेत आपले उपोषण मागे घेतले आहे.
पंढरपूर - महाराष्ट्रातील शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत व त्यांचे इतर सहकारी हे मंत्रालय परिसरात उपोषणाला बसले होते. दोन दिवसांपूर्वी मा आ दत्तात्रय सावंत यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र मा आ सावंत यांनी हॉस्पिटलमध्येही आपले उपोषण सुरूच ठेवले होते. त्याची दखल घेत आज शासनाने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत शिक्षकांच्या मागण्या मान्य करीत अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकडयांवरील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव 20टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले.
मा आ दत्तात्रय सावंत हे शिक्षक चळवळीतुन तयार झालेले नेतृत्व असून शिक्षकांच्या प्रश्नासाठी ते नेहमी अग्रही असतात. कायम विना अनुदानित शाळांचा कायम शब्द काढून त्यांना अनुदान मिळवून येण्यासाठी तसेच जुन्या पेन्शन योजनेचा लाभ शिक्षकांना मिळावा यासाठी मैदानात, सभागृहात तसेच न्यायालयात लढा येण्याचे काम ते करीत आहेत.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. शिक्षक समन्वय संघ प्रयत्नशील होता . माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी शिक्षक बांधवांसाठी आमरण उपोषण पुकारले होते. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या मागणीला यश आले असून आता शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वाढीव वेतन मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे.


