चैत्री यात्रा नियोजनाबाबत प्रांत कार्यालय येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न भातलवंडे तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, मंदिर समितीने दर्शन रांग व पत्रा शेडमध्ये पंखे, कुलर्स मॅट, स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. भाविकांना तात्काळ व सुलभ दर्शन व्यवस्थेबाबत नियोजन करावे. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांसाठी मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी नगरपालिकेने नियोजन करावे. आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याची टँकरची संख्या वाढवावी. नदीपात्रातील व घाटाची स्वच्छता करावी, अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करावी. तात्पुरते शौचालयाचे उभारणीचे नियोजन करावे.येणाऱ्या भाविकांना व शहर वासियांना वारी कालावधीत व वारी नंतर अस्वच्छतेमुळे त्रास होणार याची दक्षता घ्यावी. फिरत्या अतिक्रमण पथकांची उपलब्धता ठेवावी. अन्न व औषध प्रशासनाने खाद्य पदार्थांच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पथके नेमून मोहिम राबवावी.
आरोग्य विभागाने वारी कालावधीत वैद्यकीय पथके कार्यरत ठेवावी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा. वीज वितरण कंपनीने सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा सुरु ठेवावा. एस.टी. महामंडळाने प्रवाश्यांसाठी बस स्थानकात 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध राहिल याची व्यवस्था करावी अशा सूचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके म्हणाले, श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे 5.00 ते सकाळी 11.00 पर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, चैत्री यात्रेला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन, दिनांक 15 ते 21 एप्रिल, 2024 या कालावधीत पहाटे 5.00 ते रा.12.00 पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कायमस्वरूपी 4 पत्राशेड व तात्पुरते 4 असे एकूण 8 पत्राशेड उभारण्यात येत आहेत. दर्शनरांगेत मॅट टाकणे, बसण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत त्याचबरोबर दर्शनरांगेत दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी भाविकांना मोफत लिंबू सरबत, मठ्ठा व खिचडी वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत चैत्री वारी कालावधीत भाविकांसाठी नगरपलिका प्रशासनाने केलेल्या व करण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची माहिती मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली. यावेळी प्रांतधिकारी इथापे यांनी सार्वजनिक बांधकाम, तहसिल, पोलीस विभाग, पाटबंधारे आदी विभागांचा आढावा घेवून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.



