पंढरपूर* :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना महाराष्ट्र शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्याबाबत मंदिर समितीचे मा सह अध्यक्ष व मा कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन व समक्ष भेट घेवून चर्चा केली होती. त्यावेळी सन्माननीय महोदयांनी मंदिर समिती ही कर्मचा-यांना वेतन व भत्ते वाढवून देण्यास अनुकुल व सकारात्मक आहे. याबाबत मंदिर समितीच्या दि.25/03/2022 रोजीच्या सभेत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. या आश्वासनास दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही मंदिर समितीने कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही केलेली नाही. तसेच सदरचे आश्वासन दिल्यानंतर मंदिर समितीची दि.12/05/2022 रोजी सभा झाली. त्यामध्ये देखील मंदिर समितीने निर्णय घेतलेला नाही. यावरून मंदिर समिती कर्मचा-यांना शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू 
करण्यास विलंब करित असल्याचे दिसून येत आहे.
	याबाबत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांची आज शुक्रवार दिनांक 10 जून, 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता श्री संत नरहरी सोनार मठ, पंढरपूर येथे बैठक संपन्न झाली. त्यामध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांनी आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांना शासनाच्या स्थायी कर्मचा-यांप्रमाणे तात्काळ वेतन व भत्ते लागू करावे अन्यथा माहे जूलै, 2022 पासून आंदोलन करण्याचे ठरले आहे. 
सदर बैठकीस श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील 100 कर्मचारी उपस्थित होते. 
7 ते 30 वर्षे इतकी सेवा झालेले विविध संवर्गातील कर्मचारी मंदिर समितीच्या आस्थापनेवर तटपुंज्या वेतनामध्ये काम करीत आहेत. सध्या वाढती महागाई लक्षात घेता, मंदिर समितीने सकारात्मक निर्णय घेऊन मंदिर कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांनाप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत अशी अपेक्षा कर्मचारी वर्ग व्यक्त करीत आहेत. वाढती महागाई व तटपुंज्या वेतनामुळे कर्मचा-यांना घरखर्च भागविणे जिकीरीचे होत आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या कर्मचा-यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
.

 
  