चिपळूण शहराला पावसाने मोठा दणका दिला आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे. खाली पाणी आणि वरून पाऊस अशी चिपळूण शहराची अवस्था आहे. शहराला पाण्याचा वेढा पडत असतानाच चिपळूण बस स्थानकातही पाण्याने आक्रमण केले. वाढत्या पाण्यामुळे जो तो आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होता. बस स्थानकात पाणी शिरत असल्याचे पाहून बस आगार व्यवस्थापक रणजित राजे शिर्के यांनी आपला जीव वाचविण्यासाठी धावपळ केली नाही. पाणी पाहून ते धावले पण राज्य परिवहन महामंडळाची रक्कम वाचविण्यासाठी !
स्थानकात पाणी घुसते आहे हे लक्षात येताच रोकड विभागात धाव घेतली आणि साडे सात लाख रुपयांची रक्कम सुरक्षित केली. तेथील संगणक काढून एस टी बस मध्ये ठेवले. पाणी वाढतच असल्याचे पाहून त्यांनी ही रक्कम आपल्या पोटाजवळ घट्ट पकडून ठेवली. त्यानंतरही पाणी वाढतच असून धोका लक्षात घेऊन त्यांनी बसच्या टपाचा आधार घेतला. त्यांच्यासह अन्य दहा कर्मचारी धोक्यात आले होते. ते सगळे बसच्या टपावर गेले. सुरुवातीला सुरक्षित वाटले पण नंतर तेथेही धोका निर्माण झाला. ज्या बसच्या टपावर राजेशिर्के आणि अन्य कर्मचारी गेले होते ती बस पाण्यात पूर्ण बुडू लागली होती, पहाटे पाच वाजल्यापासून जीव वाचविण्यासाठी सगळे जीवापाड प्रयत्न करीत होते. बसच्या टपाचा आधार घेतला पण ती बसही आता बुडण्याच्या स्थितीत होती. तब्बल 10 तासानंतर पाण्यात अडकलेल्या या व्यक्तीची अखेर एन डी आर एङ्ग च्या जवानांनी सुटका केली.


