पंढरपूर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून संतांच्या पालख्या आता पंढरीकडे वाटचाल करतील. त्यापार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपुरात 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तर नियमांसह मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. वाखरी ते इसबावी दरम्यान मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक पालखीसोबत 40 वारकर्यांना पालख्यांसोबत सहभागी होता येणार आहे. मात्र, इसबावी इथून प्रत्येक पालखीतील 2 व्यक्तींना पुढे पंढरपुरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहितीही तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
पंढरपूर प्रशासनाची महत्वाची बैठक
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाने आज महत्वाची बैठक घेतली. कोरोना संकटाामुळे यंदाची आषाढी एकादशीही प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. आषाढी एकादशीपूर्वी काय तयारी करावी लागेल, या अनुषंगाने आज पंढरपुरातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रांताधिकार्यांनी सर्व अधिकार्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.
आषाढी वारीसाठी सरकारने मान्यता दिलेल्या पालख्या आणि पालख्यांसोबत वारकरी पालखीतळावर आल्यानंतर तिथून पंढरपूरकडे येईपर्यंत, एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत काय काळजी घ्यायची यासंदर्भातील सूचना प्रांताधिकार्यांनी दिल्या आहेत. या काळात बाहेरुन आलेल्या वारकर्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. पंढरपुरातील रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत. वारकरी ज्या ज्या ठिकाणी थांबणार तो मठ आणि परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी थांबतील त्या ठिकाणचा सर्व परिसर, इमारतींचंही निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
.


