पंढरपूर- भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा.ना. उत्पात यांचे कोरोना आजाराने पुण्यात हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी निधन झाले. ते 80 वर्षाचे होते.
कै. वा.ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व आध्यात्मक्षेत्रातील प्रमुख नाव असून त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भुषविले होते. ते येथील प्रसिध्द शैक्षणिक संस्था पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. आयुष्यभर वा.ना. उत्पात यांनी अध्यापनाचे कार्य केले. ते कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते. तसेच त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली व भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून भव्य वास्तू व क्रांतीमंदिराची उभारणी केली. याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करून गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय केली होती. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे.

