पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने नुकताच ऑनलाईन कला महोत्सव घेण्यात आला. यामध्ये कथाकथन स्पर्धांमध्ये पंढरपूरच्या संदीप पिटके यांचा प्रथम क्रमांक आला आहे. विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा. या हेतूने ऑनलाईन कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कथाकथन , वक्तृत्व, काव्यवाचन , एकपात्री अशा विविध स्पर्धांचे आयोजन होते.
यामध्ये कथाकथन या स्पर्धा प्रकारात संदीप पिटके यांनी सादर केलेल्या कथाकथनाचा व्हिडिओ विद्यापीठास पाठवला होता. यानंतर कथाकथन स्पर्धा प्रकारात आलेल्या सर्व स्पर्धकांचे सादरीकरण पाहून त्याचा अंतिम निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. यामध्ये पिटके यांचा प्रथम क्रमांक आला आहे.
संदीप पिटके हे पंढरपुरातील एक हरहुन्नरी कलावंत म्हणून ओळखले जातात. प्रतिभा क्रिएशन या संस्थेच्या माध्यमातून आणि इतरही संस्थांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमात ते नेहमीच अग्रेसर पणे सहभागी असतात. त्यांच्या या यशाबद्दल सध्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


