मुंबई, पुण्याबरोबरच सोलापूर शहरातही कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे.त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात सर्वत्र ‘जनता बंद’ पाळण्यात येत आहे. या बंदला शहरासह तालुक्यातील ७० गावातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दूध,औषधे आणि दवाखाने वगळता सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केले आहे. तालुक्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पुकारला आहे.
सोलापूर जिल्हा हा कोरोनामुक्त होता. मात्र गेल्या काही दिवसात सोलापूर शहरात करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.काल बुधवारी रात्री पर्यंत तब्बल 33 बाधित रुग्ण सोलापूर शहरात आढळून आले तर त्यापैकी 3 व्यक्ती मृत घोषित करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे पंढरपूर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील जनतेने करोनाची साखळी तोडण्यासाठी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्षा भोसले यांनी पंढरपूर शहरात ३ दिवस बंद पुकारला आहे. शहरातील औषधे,दवाखाना, दूध सेवा वगळता अन्य सर्व सेवा शुक्रवापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. या बंदला शहरातून १०० टक्के पाठिंबा नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दिला आहे.


