पंढरपूर : संपूर्ण देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी बाहेर पडू नये असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, काहीजण विनाकारणच घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना सुरुवातीला पोलिसी दंडुक्याचा प्रसादही मिळाला आहे.मात्र, यातूनही काहींनी बोध घेतलेला दिसत नाही.
यावर उपाय म्हणून पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी अनोखी शक्कल लढवली. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात लॉकडाऊन केले आहे. मात्र, तरीही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई ऐवजी अनोख्या पद्धतीनं प्रबोधन केलं. दुचाकीस्वारांच्या कपाळाला बुक्का लावून त्यांना अभंग गायला लावले. त्याचबरोबर विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.
शहरातील मुख्य ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना त्यांनी थांबवले. त्यानंतर रणजीत पाटील, अभिजित कांबळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कपाळावर बुक्का लावला. तर प्रसाद औटी यांनी त्यांना हरिपाठ आणि तुकोबांचे अभंग म्हटले आणि नियम मोडणाऱ्यांनाही म्हणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी मिळून विठुरायाचा जयघोष केला.

