कै. मनोजदादा प्रचंडे गणेशोत्सव मित्र मंडळ यांच्या सौजन्याने व्यासनारायण नगरात मोफत बांधकाम कामगार योजना व आयुष्यमान भारत कार्ड वाटप

0

 

गणेशोत्सवानिमित्त व्यासनारायण नगरात मोफत बांधकाम कामगार योजना व आयुष्यमान भारत कार्ड वाटप

पंढरपूर (प्रतिनिधी) – गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि समाजसेवेची प्रेरणा देणारा उत्सव मानला जातो. या पार्श्वभूमीवर कै. मनोजदादा प्रचंडे गणेशोत्सव मित्र मंडळ व समाजसेवक अमित उर्फ सोनूतात्या माने यांच्या सौजन्याने व्यासनारायण नगर झोपडपट्टी भागात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत बांधकाम कामगार योजना नोंदणी तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत कार्ड वाटप करण्यात आले.

    या विशेष उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. बांधकाम कामगारांसाठी शासनाने सुरू केलेल्या योजनेमुळे आर्थिक मदत, शैक्षणिक सुविधा, विमा संरक्षण यांसारखे विविध लाभ मिळतात. तर आयुष्यमान भारत योजना ही गरीब व गरजू कुटुंबांना पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचार देणारी योजना आहे. या दोन्ही योजनांचा लाभ एकाच ठिकाणी व तोही मोफत उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांमध्ये मोठा उत्साह व समाधानाचे वातावरण दिसून आले.

समाजसेवक सोनू तात्या माने यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “गणेशोत्सव हा फक्त धार्मिक विधींनी साजरा करायचा सण नसून समाजातील वंचित, गरजू घटकांना हातभार लावण्याची खरी संधी आहे. नागरिकांना थेट मदत व सुविधा मिळाव्यात, यासाठीच हा उपक्रम राबवण्यात आला. भविष्यातही असे उपक्रम राबवून अधिकाधिक नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोचवण्याचा आमचा संकल्प आहे.”

या कार्यक्रमासाठी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तापंत कोळी, रामभाऊ कांबळे, मंडळाचे संस्थापक सोनूतात्या माने, आधारस्तंभ निलेश परचंडे, अमोल माने, अनिल गायकवाड, संतोष ढोबळे, पांडुरंग माने, रोहित अभंगराव, दयानंद कोळी, सत्यम दिक्षीत, करण सालविठ्ठल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

या उपक्रमामुळे व्यासनारायण नगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आयोजक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांनी “अशा उपक्रमांमुळे खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाला सामाजिक परंपरेची जोड मिळते” अशी प्रतिक्रिया दिली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसोबतच अशा सामाजिक व लोकहितकारी उपक्रमांचे आयोजन केल्याने नागरिकांना योजनांचा लाभ मिळतो आणि समाजात एकात्मतेची भावना वृद्धिंगत होते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)