500 स्थलांतरीत रहिवाश्यांना दिवसातून 3 वेळा फुड पॅकेट.
पंढरपूर (ता.06)- उजनी व वीर धरणातील विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पंढरपूर शहरातील नदीकाठच्या काही रहिवाश्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. स्थलांतरित रहिवाशांना मंदिर समिती मार्फत फुड पॅकेटची उपलब्धता करून देण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
मंदिर समितीने सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून तसेच स्थानिक प्रशासनाने विनंती केल्याने पंढरपूर शहरातील सुमारे 500 स्थलांतरीत रहिवाश्यांना सकाळी नाष्टा, दुपारी जेवण व रात्री जेवण असे 3 वेळा फुड पॅकेट वाटप करण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ आज दिनांक 06 ऑगस्ट रोजी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे व ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, विभाग प्रमुख राजेश पिटले, सहायक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी उपस्थित होते. सदरचे फुड पॅकेट मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये तयार करून वाटप करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.




