आषाढी यात्रेतील सर्व कामे वेळेत पूर्ण करून भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा मिळणार, - सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर

0

पंढरपूर - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार दिनांक 17 जुलै, 2024 रोजी  संपन्न होणार असून, या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने सर्व कामे वेळेत पूर्ण करून भाविकांना पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

दिनांक 22 जून रोजी सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची सभा श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. या सभेस सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व सर्व खात्याचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

याशिवाय, शासकीय महापूजेवेळी गाभाऱ्यातील उपस्थितांच्या संख्येबाबत जिल्हा प्रशासनाचे अभिप्राय घेणे, गाभा-यातील तसेच विठ्ठल सभामंडप, बाजीराव पडसाळी येथील सर्व कामे 30 जून पूर्वी पूर्ण करणे, मंदिर समितीच्या सन 2024-2025 च्या 76 कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी, मंदिर समितीच्या जमिनी खंडाने देणेबाबत लिलाव प्रक्रिया राबविणे, निर्माल्यपासून अगरबत्ती व धुप तयार करणे इत्यादी निर्णय सभेत घेण्यात आले. तसेच 15 व्या वित्त आयोग अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिराकरीता श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप व श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे मोफत जागा उपलब्ध करून देण्याचे ठरले. त्यामुळे भाविकांना व नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)