चैत्री वारीत भाविकांच्या आरोग्य सुरक्षितेला व स्वच्छतेला प्राधान्य - प्रांताधिकारी सचिन इथापे

0



भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना
   पंढरपूर - चैत्री शुध्द एकादशी 19 एप्रिल  रोजी असून, या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची  गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने  आवश्यकती  तयारी केली आहे. सध्या उन्हाळा सुरु असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.  यात्रेसाठी येणा-या  भाविकांना उष्णतेचा त्रास होवू नये यासाठी  भाविकांच्या आरोग्य सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच भाविकांना आवश्यक सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी पाच आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असून, हे कक्ष 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती  प्रांताधिकारी सचिन इथापे  यांनी दिली.
                   चैत्री यात्रा  तयारीबाबत प्रांत कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पंढीत कोळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, तालुका आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
  चैत्री  वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने  कोणतेही गैरसोय येऊ नये  यासाठी  पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, नगरपालिका या पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश प्रांताधिकारी इथापे यांनी दिले.
आरोग्य विभागामार्फत यासाठी  पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन मंडप, पोलीस संकुल येथे प्रथमोपचार केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करण्यात येणार आहे. सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे. तसेच नगरपरिषद व मंदीर समितीकडून दर्शन रांग, पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर व मंदीर परिसर येथे वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार आहे. भाविकांच्या सुविधेसाठी दिशा दर्शक फलक, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता गृहे आदी सुविधेबाबतचे दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत.  मंदीर समिती कडून दर्शन रांगेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मॅट, कुलर, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत.               
                    65 एकर परिसरात मुबलक प्रमाणात पाणी व्यवस्था, अखंडीत व सुरक्षित विद्युत पुरवठा, अगिनशमन व्यवस्थेसह फिरते आरोग्य पथकांची  नेमणूक करण्यात आली आहे.नदीपात्रात स्वच्छता व पुरेसा प्रकाश राहिल याची दक्षता घेवून,  शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी, वाहतुकीस कोणतेही अडचण येवू नये यासाठी शहराबाहेर मोकळया जागेवर वाहन  पार्किग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यकतो बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी इथापे  यांनी सांगितले. 
00000000

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)