पंढरपूर (प्रतिनिधी) ओबीसी आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुदत संपून गेलेल्या जि.प. आणि न.पा.च्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून भोसे जिल्हा परिषद गटात उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. खुल्या प्रवर्गासाठी असणाऱ्या या गटात गणेश पांडुरंग पाटील यांच्या विरोधात खमका उमेदवार देण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
आ. बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. माजी आ. प्रशांत परिचारक हे भाजपामध्ये ठाम आहेत. साहजिकच शिंदे परिचारक ही पूर्वापारपासूनची युती पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या फुटीमुळे पुन्हा निर्माण झाली आहे. साहजिकच भोसे जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारास मोठे बळ प्राप्त होणार आहे. आ. शिंदे आणि परिचारक गटाने या गटात उमेदवाराची चाचपणी सुरू केली असून, या गटात खमका उमेदवार देऊन त्यास विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
भोसे जि.प.गट हा स्व. राजूबापू पाटील यांचा अभेद्य गट असल्याचे मागील निवडणुकांवरून सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश पाटील हे या गटातून शरद पवार राष्ट्रवादीतून निवडणूक लढवतील अशी अपेक्षा असून, त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारास अनन्यसाधारण महत्त्व आहे. आ. शिंदे आणि परिचारक गटास या जागेसाठी मोठे बळ लावावे लागणार आहे. या दृष्टीने महायुतीतून प्रयत्नास सुरुवात झाली असून, या प्रयत्नाचा एक भाग म्हणून हरिश्चंद्र तळेकर या उमेदवाराचे नाव समोर येऊ लागले आहे. हरिचंद्र तळेकर यांना मागील पंचायत समिती निवडणुकीत परिचारक गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. ऐनवेळेस त्यांची उमेदवारी कापून कलावती महादेव खटके यांना उमेदवारी बहाल करण्यात आली होती. आता जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येत असून, अनेक दिग्गज राजकारण्यांची त्यांच्यावर बारीक नजर असल्याचे दिसून येत आहे. हरिचंद्र तळेकर हे प्रथमतः शिवसेनेच्या मुशीत तयार झालेले व्यक्तिमत्व आहे.
त्यांनी भैरवनाथ बचत गटाच्या माध्यमातून अख्खा जि.प. गट पिंजून काढला होता. शुगरकेन हार्वेस्टरच्या माध्यमातून त्यांचा या भागातील शेतकऱ्यांची मोठा जनसंपर्क आला होता. यामुळेच त्यांना मागील पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. आता आ. शिंदे गटाची त्यांच्यावर नजर असून, पाटील यांच्या विरोधात टक्कर देणारा हा एकमेव उमेदवार भोसे जिल्हा परिषद गटात असल्याची चर्चा आ. शिंदे गटातून होत आहे.
हरिश्चंद तळेकर हे अष्टपैलू नेतृत्व आहे. विविध पक्षातील नेतेमंडळींशी त्यांचे चांगले संबंध आहेत.याशिवाय त्यांचे आजोबा, चुलते, चुलतभाऊ आणि वडील यांना राजकीय वारसा होता. भोसे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद आणि उपसरपंचपद अनेक वर्षे त्यांच्याच घरात होते. यामुळे त्यांना भोसे गावात मोठी सहानुभूती मिळू शकते. याशिवाय भोसे गावची मतदार संख्या सहा हजारावर आहे. यामुळे याच गावातून उमेदवार निवडण्यास प्रत्येक पक्षाची पसंती असते. यामुळे हरिचंद तळेकर यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळू शकते.


