पंढरपूरच्या कार्तिकी वारीनिमित्त महाआरोग्य शिबिराला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0





पंढरपूर, २२ नोव्हेंबर – आषाढी वारीनंतर दुसरी मोठी समजली जाणाऱ्या कार्तिकी वारीनिमित्त दि. २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान पंढरपूर येथील ६५ एकर परिसरामध्ये आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

आषाढी यात्रेत आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ११ लाख ६४ हजार भाविकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले होते. त्याची नोंद जागतिक बुक रेकॉर्डमध्ये झाली होती. त्यानंतर आता पुन्हा आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिरास आजपासून सुरुवात झाली आहे. या शिबिरांमध्ये विविध रोगांवर मोफत उपचार आणि आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे या महाआरोग्य शिबिराला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 



या शिबिरासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टर, तज्ज्ञ, तंत्रज्ञ, परिचारिका व कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यासह सुमारे ३००० मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे. रुग्णांच्या सुविधेसाठी १०८ क्रमांकाच्या ७ रुग्णवाहिका ६५ एकर परिसर, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर आणि इतर ठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सहा ठिकाणी अतिदक्षता विभाग, तीन हिंदुदृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ११ प्राथमिक उपचार केंद्रे आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. आरोग्य या महाआरोग्य शिबिरात भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत घेण्यात येत आहे. 


या महाशिबिरातून नेत्रविकार, हृदयरोग, किडनी, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, हाडांची तपासणी, ईसीजी व सोनोग्राफी तपासणी, रक्त तपासणी, उच्च रक्तदाब, त्वचारोग, दंतरोग, संसर्गजन्य रोग (क्षयरोग, कुष्ठरोग), कॅन्सर यांसारख्या रोगांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ज्या वारकऱ्यांना शस्त्रक्रिया व सुपरस्पेशालिटी सेवेची आवश्यकता भासेल, त्यांची स्वतंत्रपणे यादी करून, सर्वांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.या महाआरोग्य शिबिरासाठी भैरवनाथ शुगर्स व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे स्वयंसेवक सक्रिय योगदान देत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)