सोलापूर : पत्रकारांसाठी साकारत असलेला गृहनिर्माण प्रकल्प लवकरच पूर्ण होण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देऊन आपण सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर होते. महसूल भवनाच्या उद्घाटनानंतर ते हुतात्मा स्मृती मंदिर येथे महापालिकेने आयोजित केलेल्या कामासाठी मार्गस्थ होत असताना भाजपचे 'प्रदेश सदस्य शहाजी पवार यांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी विजापूर रस्त्यावर पत्रकारांसाठी उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाला धावती भेट दिली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शहाजी पवार हे उपस्थित होते.यावेळी फडणवीस यांनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देऊ आणि शासन या प्रकल्पाच्या परिपूर्तीसाठी निश्चितच सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भूमिपूजन समारंभाला आपण उपस्थित होतो, याची आठवण विखे-पाटील यांनी यावेळी करून दिली.श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. पत्रकारांसाठी मंजूर केलेला हा राज्यातील पहिला गृहप्रकल्प असून त्याचे भूमिपूजन आपल्याच हस्ते झाले आहे. या घराच्या चाव्याही आपल्याच हस्ते आम्हाला मिळाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली.


